उमरगा (ता.१३) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणी करिता महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ‘स्कूल कनेक्ट २.०’ अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवी वर्गाच्या बदलेल्या अभ्यासक्रमाबद्दल आणि त्याविषयी शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती व्हावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने परिसरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पदवी संरचनेत झालेले बदल आणि अभ्यासक्रमातील बदल तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी महाविद्यालयात एनईपी सेल स्थापन केला आहे. या सेलचे समन्वयक डॉ. प्रवीण माने आहेत.
सहा जानेवारीपासून या अभियानाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून करण्यात आली. आठ जानेवारी रोजी ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी, नऊ जानेवारी रोजी डॉ. के. डी. शेंडगे कनिष्ठ महाविद्यालय उमरगा, दहा जानेवारी रोजी शरचंद्र पवार महाविद्यालय नाईचाकूर तर 13 जानेवारी रोजी मुरूम येथील भारत शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रभावीपणे हे अभियान राबविण्यात आले.
या अभियानात एनईपी सेलचे समन्वयक डॉ. प्रवीण माने यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदल समजावून सांगितले. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, तीन-चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम, आंतरविद्याशाखीय विषयांची निवड पद्धती, विविध स्कॉलरशिप, आंतरवासिता, इंटर्नशिप आणि श्रेयांक पद्धती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या स्कूल कनेक्ट अभियानात डॉ .डी.बी. ढोबळे, डॉ. सुभाष इंगळे, डॉ. संदिपान सावंत, डॉ. धनराज इटले आणि डॉ. अजित आष्टे यांनी सक्रिय पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वीपणे राबविले.
या अभियानात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले, विविध कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.