क्रांतिवीरांचा वारसा लाभलेले क्रांतिकारी शैक्षणिक संकुल ……विकास अहिर
म्हसवड…प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणारे थोर स्वतंत्र सैनिक पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकवडी यांचा वारसा लाभलेले म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल यशाची उंच भरारी घेत असल्याचे प्रतिपादन माण तालुक्याचे तहसीलदार विकास अहिर यांनी केले.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून माण तालुक्याचे तहसीलदार विकास अहिर तर कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते . त्यानिमित्ताने संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, मंडल अधिकारी सुनील खेडेकर व सुशांत पावरा, प्राचार्य विन्सेंट जॉन, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार विकास अहिर म्हणाले थोर स्वातंत्र्यसैनिक पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पदस्पर्शाने क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवडची भूमी पावन झाल्याचे दिसून येत आहे . आज या ठिकाणी उच्चांकी दोन हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत याचा मला रास्त अभिमान आहे. सर्वगुणसंपन्न विद्यार्थी हीच देशाची संपत्ती आहे. सकारात्मक दृष्टिकोन जोपासून यशाची उंच भरारी घेण्याचे आवाहन तहसीलदार अहिर यांनी केले.
पुढे बोलताना तहसीलदार अहिर म्हणाले खेळात मैत्रीपूर्ण स्पर्धा करा. शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी खेळ महत्त्वाचे साधन आहे. अभ्यासाबरोबरच खेळालाही वाव द्या. संकटावर मात करा, जिद्द चिकाटी बाळगा , अभ्यासाचे नियोजन करा, आई वडील गुरुजनाचा आदर बाळाचा. चांगले सवंगडी निवडा. टीव्ही मोबाईल मधील अनावश्यक बाबीपासून दूर राहा, सर्वगुणसंपन्न पिढी हीच देशाची संपत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील संकुल असून गुणवत्ता हा त्याचा आरसा असल्याचे सांगितले. संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर यांचे अनेक मित्र आयएसआय व आयपीएस झाले मात्र बाबर सरांनी सुरू केलेली क्रांतिवीर शाळा भविष्यात सनदी अधिकाऱ्याची फॅक्टरी असेल असा विश्वास तहसीलदार अहिर यांनी व्यक्त केला. यावेळी गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर , संस्था सचिव सुलोचना बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य विन्सेंट जॉन यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षिका तनुजा माने यांनी केले तर उपस्थितांचे आभार समन्वयक अभिजीत सावंत यांनी व्यक्त केले.
….. चौकट…..
विद्यार्थ्यांच्या अडचणीच्या कालावधीत सार्वजनिक सुट्टी व घड्याळाची वेळ न पाहता विद्यार्थ्यांना मदत करणारा अधिकारी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तहसीलदार विकास अहिर असल्याचे एका प्रसंगाचा दाखला देत अभिजीत सावंत यांनी तहसीलदार अहिर यांच्या कार्याचा गौरव केला.