विद्यार्थ्यांनी प्राचीन संस्कृतीचे ज्ञान करून घेणे आवश्यक. डॉ. सूर्यकांत अदाट
लोणंद: विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरांचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. प्राचीन भारतीय शिक्षण प्रणाली गुरुकुल शिक्षण पद्धती असून ती निवासी परंपरा होती. पूर्वी सर्वधर्म समभाव या भावनेने सर्व देशात सर्वजण नांदत होते. विद्यार्थ्यांनी जागतिक वारसा असणारी स्थळे व त्यांची स्थापत्यशैली, प्राचीन संस्कृतीचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे. मंदिरे नुसती वास्तू नसून इतिहास, अध्यात्म, वास्तुकला, शिल्पकला यांचा अंतरभाव त्यात असतो. पूर्वीच्या मानवाचे राहणीमान, वस्त्रे, वेशभूषा, अलंकार यातून संस्कृतीचे दर्शन घडत होते. सिंधू संस्कृतीच्या उत्खननातून त्यावेळच्या संस्कृतीचे दर्शन घडत आहे.” असे प्रतिपादन प्रा संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर येथील इंग्रजी विभागातील प्रा.डॉ. सूर्यकांत अदाटे यांनी केले.
लोणंद येथील रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथे शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत इतिहास व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय ज्ञान परंपरा” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांसाठी प्राचीन ज्ञानाची दारे खुली करणारे आहे. हेमाडपंथीय मंदिरे ही भारतीय परंपरेचे ज्ञान देणारी आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव हे आहाराच्या अनुषंगाने निर्माण झालेले आहेत. याचे ज्ञान अलीकडच्या पिढीला होणे आवश्यक आहे.”
यावेळी व्यासपीठावरती पाहुण्यांच्या समवेत कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.भीमराव काकडे, भूगोल विभाग प्रमुख प्रा. रवींद्र सोनवणे, हिंदी विभाग प्रमुख प्रा. एम. डी. नायकू आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. रवींद्र सोनवणे यांनी करून दिला. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.सुनील बागवडे, मराठी विभाग प्रमुख प्रा.सुभाष कदम, डॉ. रामचंद्र कुंभार, प्रा. बागुल, प्रा.उमेश शिंदे, प्रा. दीक्षा गायकवाड, प्रा. सुषमा थोरात, प्रा. पूजा घोडके, प्रा. सतीश कांबळे व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कु. कोकिळा चांगण यांनी केले. मान्यवरांचे आभार भीमराव काकडे यांनी मानले.