विद्यार्थ्यांनी मराठीतील ज्ञान व भाषेवर प्रभुत्व मिळवणे काळाची गरज. प्रा. डॉ. प्रभाकर पवार
लोणंद- जगातील अनेक देशांत मराठी भाषक समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. शब्दात मोठी ताकद असते, ती समजून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मनातला न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. मराठी भाषेतून व्यवसायाच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवचन व कीर्तन या कलेमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी सामाजिक व अध्यात्मिक ज्ञानाबरोबर मराठीतील ज्ञान व भाषेवर प्रभुत्व मिळवणे काळाची गरज आहे. विविध मराठी वाहिन्यांवरती अनेक मालिका सुरू आहेत. त्यामध्ये संवाद लेखन, पटकथा लेखन, गीत लेखन, कथालेखन यासाठी मराठी भाषेची आवश्यकता आहे. तसेच अनुवाद, प्रकाशन, मुद्रित शोधन, ब्लॉग लेखन, वेब सिरीज संवाद, बातमी लेखन, सूत्रसंचालक, परिसंवाद लेखन या क्षेत्रांमध्ये मोठी संधी आहे. ज्या मोबाईलचा तुम्ही प्रचंड वापर करता त्यामध्ये प्रतिलिपी, ऑडिओ बुक, स्टोरी टेल, आय बुक यांचा पाच कोटी वाचक आहे. या क्षेत्रात ही अर्थार्जनासाठी प्रचंड मोठी संधी आहे. राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, असिस्टंट, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक यासारख्या शासकीय सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षेमध्ये मराठी विषयाला स्थान मोठे आहे. याची जाणीव विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांना नाही ही गोष्ट दुर्दैवाची आहे. शब्दही मोठे भांडवल आहे. त्याचा वापर करून जीवन यशस्वी करता येते.” असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय फलटण येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.
लोणंद येथील रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथील मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या सामंजस्य करार अंतर्गत आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘ मराठी भाषा आणि रोजगाराची संधी ‘ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. भिमराव काकडे होते. यावेळी व्यासपीठावरती मराठी विभाग प्रमुख प्रा. सुभाष कदम, प्रा. एम. डी. नायकू, पत्रकार अभिशेख सरगर, डॉ. कोकिळा चांगण, प्रा. सतीश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा. सुभाष कदम यांनी करून दिला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कोकिळा चांगण यांनी केले व मान्यवरांचे आभार प्रा.सतीश कांबळे यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी मराठीतील ज्ञान व भाषेवर प्रभुत्व मिळवणे काळाची गरज. प्रा. डॉ. प्रभाकर पवार
